Description
धनंजय गोवर्धने हे चित्रकार आणि कवी आहेत. साहजिकच कोमल हृदयाने कुंचला चालवावा तशी चित्रणे या पुस्तकात उतरली आहेत. त्यांनी पाहिलेलं बदलतं नाशिक, गंगेकाठची संस्कृती, तिथली कुंडं आणि मंदिरं यांच्या संदर्भातल्या बदलत्या वास्तवाचं, त्याच्या प्रवासाचं हळुवार चित्रण त्यांनी केलेलं आहे. ते भावविभोर आहे, पण अकारण भावविव्हल नाही आणि हे इतकंच नाही. हे लेखन करून ते आपल्या साऱ्यांच्या मनातलं नाशिक, आपल्या मनातला नदीकाठ जागा करतात. वेगवेगळ्या नावांनी आपल्या मनाच्या तळाशी आपापले नाशिक आणि नदीकाठ असतातच ते सहजपणे पृष्ठभागावर येतात आणि कळतं की, हे तर फक्त निमित्त आहे. ते वापरून गोवर्धने मानवी भावबंधांचा जो गोफ उभा करतात तो असाधारण आहे. ‘निःशब्द कोलाहल’ मधील मुक्या बहियांचे राष्ट्रगीत, ‘हायड्रोफाईट्स’ मधील जलपर्णीचा जाच, ‘जुन्या तांब्या नवा नटराज’ मधील जीवनमरणाचे सूत्र आणि एकूण ‘जीवनगाणे’ हे सारे लेखन अस्वस्थ गांभीर्याचे नाद आपल्या मनात निनादत ठेवणारे आहे. नदीच्या मातृरूप वात्सल्याचा ओलावा आणि जिव्हाळा या साऱ्याला लाभल्यामुळे या लेखनाला गडद करुणेचे वस्त्र अंगभूतपणे मिळालेले आहे.