या पुस्तकाविषयी
कथा हा कथनात्मक ललित साहित्याचा एक प्रकार आहे. विशिष्ट आशय सूत्रानुसार कल्पित घटना मालिकेचे कथन/निवेदन करणे हे कथनात्मक साहित्याचे महत्त्वाचे लक्षण सांगता येईल. विशिष्ट दृष्टिकोनातून हे निवेदन निवेदक करीत असतो. कथेमध्ये ज्या घटनांची गुंफण केलेली असते त्या घडून गेलेल्या घटना असतात. कथानक, पात्र, वातावरण, निसर्ग आणि भाषा हे घटक मिळून कथा मूर्त स्वरूपाला येते.
एक गद्य कथनात्मक साहित्य प्रकार म्हणून कथेला स्वतंत्र अस्तित्व आहे. लहानपणी ऐकलेल्या चिऊ काऊच्या कथेपासून आजच्या आधुनिक स्त्रीवादी कथेपर्यंतचा प्रवास जितका रंजक आहे तेवढाच अंतर्मुख करणारा आहे. वाचकाचे अनुभवविश्व अधिक व्यापक करणारा आहे.
'तिचं आभाळ' या स्मिताताईंच्या कथासंग्रहात वाचकांना वेगळ्या अनुभव विश्वात घेऊन जाणाऱ्या कथा आहेत.
लोकसत्ता, झपूर्झा, अक्षरवैदर्भी, अनुराधा, तरूण, माहेर अशा दर्जेदार अंकांमध्ये पूर्वप्रसिद्धी मिळालेल्या... नव्या जाणिवांच्या अशा १४ कथा 'तिचं आभाळ' या कथासंग्रहात समाविष्ट आहेत.
संवेदनशील मनाच्या लेखिकेने सभोवतालच्या स्त्रियांचे भावविश्व यात रेखाटले आहे. कौटुंबिक आणि सामाजिक वास्तव परिस्थितीची चिकित्सा न करता स्त्री मनाच्या व्यथांची जाणीव करून देणाऱ्या या कथा आहेत. लेखिकेने नातेसंबंध, कुटुंब, बदलती सामाजिक परिस्थिती यांचं बारकाईने केलेलं निरीक्षण आहे. परंपरा जपताना स्त्रियांना करावी लागणारी तारेवरची कसरत, तरीही स्वतःचा मार्ग स्वतः निवडणाऱ्या स्त्रिया यात आहेत.
या संग्रहातील स्त्रीकेंद्री कथांमधून 'ओलं आभाळ' जिच्या संसारावर उतरलं असलं तरी बेघर झालेल्या पाखरांच्या डोळ्यातील करुणा जिच्या मनाला घर पाडत असते अशी 'सविता', अॅसिड हल्याने शरीराच्या होरपळण्यापेक्षा भावनेची राखरांगोळी झालेली 'रिया', काबाड कष्ट करूनही निराधार 'शालू वहिनीच्या' आयुष्याची झालेली ससेहोलपट, निशा, स्टेला, प्रिया अशा प्रत्येकीच्या जगण्याचे बहुपेडी आयाम लेखिकेने कथन केले आहेत.
'तिचं आभाळ' मधील स्त्रियांच्या भावना, संघर्ष आणि अस्तित्वावर आधारित हृदयस्पर्शी कथा वाचकांना अंतर्मुख करतील.
- प्रा. संध्या शहापुरे
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.