Availability: In Stock

Bhavtalchi Manasa | भवतालची माणसं

260.00

ISBN :- 9788197093418

Publication Date :- 12/12/2023

Pages :- 147

Language :- Marathi

Description

सतीश कामत यांच्या ‘भवतालची माणसं’ या व्यक्तिचित्रांच्या संग्रहातील जमिनीवरच्या माणसांची ५१ रेखाटने, हा समकालीन सुखदुःखाचा लक्षणीय कोलाज आहे. ही ‘भवतालची माणसं’ तशी सर्वसामान्य आहेत. पण त्यांचा जीवनसंघर्ष आणि आंतरिक श्रीमंती दाखवताना लेखक त्यांच्या मानसिकतेचा शोध घेतो, हा या व्यक्तिचित्रांचा विशेष गुण आहे. सतीश कामत सहृदयतेने ही माणसं समजून घेतात, त्यांचे भावदर्शन घडवितात आणि वाचक म्हणून आपणही भवतालच्या माणसांच्या कुटुंबात नकळत सामील होतो.

तरुणपणी देखणी असलेली आणि म्हातारपणी सुरकुत्यांची जाळी झालेली सावत्याची जना ‘पांढऱ्या पायाची’ म्हणून गावच्या अंधश्रद्धेची बळी होते. ‘दृष्टाव्याची म्हातारी’ मध्ये तिच्या आयुष्याची परवड वाचत असताना आपलेही डोळे पाणावतात. ‘सर शिकायचे आहे पण…’ मधली शेतकरी कुटुंबातली जुई शिक्षण अर्धवट सोडते. तिला पुन्हा शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी लेखक स्वतः प्रयत्न करतो. पण ती परत शाळेत येत नाही. का बरं? आर्थिक दारिद्रयाचा पेच ? रूढी परंपरा? की शिक्षण व्यवस्थेवरचा अविश्वास ? लेखक स्वतःलाच प्रश्न विचारतो आणि आपणही अंतर्मुख होतो.

‘पुस्तकेच मस्तके घडवितात’ या वचनावर विश्वास असलेले समाजवादी प्राध्यापक टाकळकर कुणाच्याही लग्नात पुस्तकांचा आहेर करतात. ते प्लास्टिकविरोधी आहेत. लोकांच्या टिंगल टवाळीला न जुमानता ते स्टीलच्या किटलीतून पाणी आणतात. ‘किटली, सायकल आणि ग्रंथ’ मध्ये भेटणारे प्रा. टाकळकर प्रवाहाविरुद्ध पोहणारे म्हणून लक्षात राहतात. सावकारी नष्ट करण्यासाठी पोलिसांशी झुंजणारा, कृष्णा खोऱ्यातील आया बहिणींचा भाऊ झालेला बापू बिरू वाटेगावकर ‘गरिबांचा रॉबिनहूड’ कसा होतो, याची चित्तवेधक गोष्ट लेखक सांगतो. ‘फक्त लढ म्हणा’ मधला कचरू वॉचमनही लक्ष वेधून घेतो.

सतीश कामत यांची ‘भवतालची माणसं’ वाचकांशीही घट्ट जोडली जातात. त्यांना ती आपलीशी वाटतात आणि हेच या व्यक्तिचित्र संग्रहाचे वाङ्मयीन सामर्थ्य आहे.

– डॉ. महेश केळुसकर

Additional information

Book Author