Description
साहित्यपर विषयांवर वेळोवेळी केलं जाणारं लेखन, हे एक प्रकारे त्या साहित्याचा मांडलेला लेखाजोखा असतो. त्या-त्या भाषांतील साहित्याच्या स्थितीगतीचा वेध घेण्यासाठी असं लेखन उपयोगी पडतं. किंबहुना विविध साहित्याविषयांवर केलेले लेखन म्हणजे अनेकदा त्या भाषेतील वाङ्मयाच्या वाटचालीचा दस्तावेजच असतो. प्रा. श्रीकृष्ण अडसुळ लिखित आणि श्रीरामपूर येथील ‘शब्दालय’ प्रकाशनकृत ‘गोमंतकीय मराठी साहित्य’ आशय आणि आविष्कार हे पुस्तक याच दृष्टीने महत्त्वाचे आहे.
प्रा. अडसुळ यांनी आजवर गोमंतकीय साहित्याची समीक्षा करणारे आणि त्याच्या वाटचालीची दिशा दाखवणारे अनेक ग्रंथ लिहिले आहेत, ते मान्यवर प्रकाशनसंस्थांनी प्रकाशित केले आहेत. त्याच मालेतील त्यांचा हा ग्रंथ आहे. या ग्रंथातील प्रत्येक लेखासाठी प्रा. श्रीकृष्ण अडसुळ यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. त्याचा अनुभव हे पुस्तक वाचताना येतो.