Description
१९९० नंतरचा काळ हा सर्वार्थाने गतिमान काळ. या कालखंडातील विविध बदलाने माणसांचे शांत, संथ जीवन पार विसकटून टाकले. मानवी नाते, स्त्री-पुरुष संबंध, विवाह, समाज इत्यादी अनेक घटकांवर त्याचा मोठा प्रभाव पडला. माध्यमक्रांतीने तर अवघे विश्व एका क्लिकवर येऊन स्थिरावले. संवादाची अनेक माध्यमे वाढली; परंतु माणसे एकमेकांपासून दुरावत गेली. या समकालीन वास्तवाचा परिणाम जसा मानवी मूल्यांवर झाला; तसाच तो कुटुंब, समाज, संस्कृती, धर्म आणि कला व्यवहारावरही झाला. या आभासी काळात नीती अनीतीच्या कल्पना खूपच धूसर झाल्या. वाढता व्यक्तिवाद, चंगळवाद आणि अस्वस्थतेने माणसाचे अवघे भावविश्व व्यापले, तो भांबावून गेला. या काळाच्या सर्वस्तरीय स्पर्धेत काय निवडावे, काय सोडावे ? याचे विवेकी भान त्यास राहिले नाही. त्याचे जीवन नानाविध समस्यांनी घेरले. यातूनच माणसे तूटत गेली. परिणामी त्यांच्या वाट्याला कमालीचे एकाकीपण आले आणि अनेक प्रश्नांचे कोलाहल घेऊन ती जगू लागली. या विसकळीतपणातून दुभंगलेली मने आणि भंगलेले सहजीवन अशा विसंगतीचे चित्र आजूबाजूला दिसू लागले. या समकालीन जीवन वास्तवाचे संभाषित म्हणजे ‘लिव्ह इन’ ही कादंबरी !