Description
… जयंत पवार या लेखकाच्या लेखनाचा विचार करताना सर्वसामान्य माणसाच्या पायाखालची जमीन आणि त्याच्या डोक्यावरचं छप्पर या बाबी त्याच्या लेखनाच्या गाभ्याशी असलेल्या दिसतात…
…स्थलांतराच्या नावाखाली विस्थापन लादलं जातं, विस्थापितांची मुळं पुन्हा कुठे रुजतच नाहीत, त्यांचं जगच हरवून जातं, ही बाब जयंत पवार हा लेखक सातत्याने अधोरेखित करत राहिला. मुळात हा त्याच्या चिंतनाचा विषय होता. गावपातळीवर तसेच जगातल्या विविध देशांमध्ये ही विस्थापनाची प्रक्रिया कशी सुरू आहे, याचा तो सातत्याने मागोवा घेत असे, अभ्यास करत असे. साहजिकच लग्न होताना आणि लग्न मोडताना बाईवर लादलं जाणारं विस्थापन हे वास्तवही लेखक म्हणून त्याला महत्त्वाचं वाटलं आणि तेच ‘माझं घर’ या नाटकातून समोर आलं…
. ‘माझं घर’मधल्या विभाचा संघर्ष वेगळा आहे. वरकरणी तो घरातल्या पुरुषसत्तेचा प्रतिनिधी असणाऱ्या नवऱ्याबरोबर आहे, पण प्रत्यक्षात शतकानुशतकांच्या प्रथांविरोधात, पुरुषाच्या हितसंबंधांनुसार बाईच्या पायाखालची जमीन काढून घेणाऱ्या पुरुषसत्ताक समाजरचनेच्या विरोधात आहे….