Description
१. डॉ. अक्षयकुमार काळे (अध्यक्ष, ९० वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन, डोंबिवली)
“मराठी गझल हे अविनाश सांगोलेकरांचे ध्यासस्थान आहे. गेली तीस- पस्तीस वर्षेव्रतस्थपणे मराठी गझलेचा त्यांनी शोध घेतला आहे. मराठी गझलेच्या वाढ-विकासासाठी ते सजग साक्षीदार आहेत. अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गझलकारांच्या प्रत्यक्ष सहवासामुळे समकालीन गझलेच्या निर्मितीप्रक्रियेविषयी प्रत्यक्ष कविमुखातून प्रगटलेली अनुभूती त्यांच्यासाठी ज्ञानरूप झाली. तिचे आणि आपल्या स्वतंत्र चिंतनशीलतेने गझलेविषयी प्राप्त केलेल्या सूक्ष्म ज्ञानाचे प्रतिबिंब ‘मराठी गझल प्रवाह आणि प्रवृत्ती’ ह्या त्यांच्या ग्रंथामध्ये समाविष्ट केल्या गेलेल्या काही गझलसंग्रहांसाठी लिहिलेल्या प्रस्तावनांतून व काही वेचक गझलसंग्रहांच्या परीक्षणांतून अगदी सहजच प्रत्ययास येणारे आणि मराठी गझलेल्या संदर्भात ज्ञानसंवर्धन करणारे आहे.”
२. शाहीर सुरेशकुमार वैराळकर (संस्थापक अध्यक्ष, सुरेश भट गझलमंच, पुणे)
“सुरेश भट आणि डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी या मराठी गझलेतल्या दोन दिग्गजांनी माझे स्नेही डॉ. अविनाश सांगोलेकर यांच्या मराठी गझलविषयक संशोधनपूर्ण लेखनाचे एके काळी भरभरून कौतुक केले होते. ‘काफला’ हा मराठीतील पहिला खराखुरा प्रातिनिधिक गझलसंग्रह सुरेश भट साहेबांच्या सोबतीने संपादित करण्याचे महत्त्वाचे काम डॉ. सांगोलेकर यांनी केले होते. अशा डॉ. सांगोलेकरांचा ‘मराठी गझल प्रवाह आणि प्रवृत्ती’ हा सोळावा ग्रंथ मराठी गझलप्रेमींसमोर येत आहे. या ग्रंथामधून अमृतराय-मोरोपंत, माधव जूलियन, सुरेश भट आणि सुरेश भटांनंतर असे मराठी गझलेचे चार प्रमुख टप्पे आणि त्या-त्या टप्प्यांमधील गझलकार, तसेच त्यांची गझल यांचे दर्शन घडते. “