Description
१. मराठी कवितेतील आधुनिकवादाची चर्चा अशा स्वरूपात प्रथमच होत असून विषयाचे नाविन्य आणि व्यासंगपूर्ण विवेचन ह्या दोन्ही दृष्टींनी प्रस्तुत ग्रंथ मराठी कवितेच्या आजवर झालेल्या समीक्षेत मोलाची भर टाकणारा आहे. विषयाचा आवाका मोठा असूनही लेखकाने आधुनिकवादाच्या चौकटीत मर्ढेकर, पु. शि. रेगे, विंदा करंदीकर, दिलीप चित्रे आणि अरुण कोल्हटकर या पाचही कवींचे सोदाहरण विश्लेषण व समतोल मूल्यमापन केले आहे. केवळ कवितांच्या संहितांच्या आधारे चर्चा न करता कवितेच्या व कवींच्या आवश्यक संदर्भांचाही विचार केलेला आहे. मराठीच्या संशोधनात अशी मौलिकता क्वचित आढळते.
– भालचंद्र नेमाडे
२. कवितेतील आधुनिकवाद हया ग्रंथात मर्ढेकर, रेगे, करंदीकर, चित्रे आणि कोल्हटकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा अभ्यासपूर्ण व मौलिक असा वेध घेतलेला आहे. नवता, आधुनिकता आणि आधुनिकवाद या संकल्पनांची चिकित्सक व्याख्या करून सुरुवातीला तयार केलेली नेटकी सैद्धांतिक चौकट आणि विवेचनातील स्पष्टता ही प्रस्तुत ग्रंथाची वैशिष्टये उल्लेखनीय होत. या कवींच्या कवितेचे आशयसूत्रे आणि शैलीवैशिष्टये या दोन्ही अंगांनी केलेले विश्लेषण त्यांच्या कवितेची एकूणता साकार करणारे आहे. पाचही कवींच्या काही कवितेतील परस्परसंबंध दाखवताना लेखकाने अवलंबिलेला तुलनात्मक दृष्टिकोन हे या ग्रंथाचे महत्त्वाचे परिमाण असून पाचही कवींच्या काही कवितांचे विस्तृत विश्लेषण पुढील अभ्यासकांना मार्गदर्शक ठरण्याइतके मोलाचे आहे. छंद, ताल, संगीत आणि चित्र यांच्याशी असलेल्या कवितेच्या संबंधाविषयीच्या अभ्यासपूर्ण विवेचनाने, तसेच, वैज्ञानिक दृष्टिकोन व बुद्धिप्रामाण्य यांच्या मर्यादा स्पष्ट करणाऱ्या युक्तिवादाने ग्रंथाची खोली वाढविली असून आजच्या साहित्यचर्चेत हे सारे महत्त्वाचे आहे.
– प्रकाश देशपांडे केजकर