Description
खूप दिवस झाले या गोष्टीला. तरीही, चांदणं उतरलेल्या शांत वाहत्या पाण्यासारख्या ह्या आठवणी कायम झुळझुळत राहतात. कधीकधी ह्या आठवणी खूप दाटून येतात. तहानेएवढी ओंजळ भरून घ्यावी; तर ती लगेच गळून जाते. ओंजळ पुन्हा रिकामी होते. तशीही माणसांची ओंजळ शापितच. रितेपणाचा शाप तिला जन्मापासून मिळालेला. पण ओंजळीतून गळून गेलेले हे दिवस आठवले, की मन अस्वस्थ होतं. आपलं गाव, माती, माणसं मागे सोडून धाव धाव धावावं; खूप दूर आल्यावरही हाताला काहीच गवसू नये; परतीच्या पायवाटाही बुजून जाव्यात, असे हे अधांतरीचे दिवस. ना आभाळ आपलं, ना माती. आरसा फुटून आपलंच प्रतिबिंब असंख्य तुकड्यात विखुरल्या जावं, असे हे आठवणींचे तुकडे. ओंजळीत भरताही येत नाही, की जुळवताही येत नाही. मग हातात येईल तो तुकडा घेऊन शोधत राहावं आपलंच फुटकं प्रतिबिंब. याशिवाय दुसरं काय उरतं आपल्या हातात?”