Description

“काळाला आव्हाने देत मध्ययुगीन संतसाहित्याने जनसामान्यांच्या मनाचे भरणपोषण केलेले दिसून येते. आजतागायत या साहित्याचा प्रभाव जोरकसपणे पडलेला दिसतो. संतसाहित्याचीमीमांसा गेली अनेक शतके चालू आहे. याचे एक महत्त्वाचे कारण त्यातून प्रकटणारी लोकोद्धाराची भूमिका हे जसे आहे, त्याचप्रमाणे संतसाहित्यातून अभिव्यक्त होणारी शाश्वत जीवनमूल्ये हे देखील आहे. अनिष्ट रुढीपरंपरा, अंधश्रद्धा, जाचक व्यवस्था या विरुद्ध आवाज उठविणारे हे साहित्य आहे. या साहित्याच्या अभ्यासकांच्या पिढ्या भिन्न भिन्न कालखंडातील असल्याने त्यांच्या आकलनाचे, अभ्यासाचे अनेकविध दृष्टिकोन त्यांच्या लेखनातून प्रकटलेले आहेत. प्रस्तुत ग्रंथ कृतज्ञ भावनेने संपादित झालेला असला तरी त्याचे अंतरंग प्रामुख्याने संतसाहित्याचे समग्रलक्ष्यी दर्शन घडविण्याची भूमिका स्पष्ट करणारे आहे. त्यातून बहुजिनसी संस्कृती आणि भिन्न भाषिक रचनांचीही नोंद झालेली असून वर्तमानाच्या प्रकाशात घेतला गेलेला संतसाहित्याचा हा वेध आधुनिक काळातील अध्यापनासाठी व्यापक विचारांची बैठक प्राप्त करून देतो. यामुळेच या ग्रंथाची मौलिकता कायम स्वरूपी अबाधित राहील.”,