Description
स्त्रीजीवनासंबंधीचा विचार हा सुटा, अलग असा करता येत नाही. समाजव्यवस्थेचे एक अभिन्न असे अंग असणाऱ्या स्त्रीचे प्रश्न हे समाजाचे प्रश्न आहेत, याचे नेमके भान बाळगणे आवश्यक आहे. स्त्रियांच्या प्रश्नांबाबत, त्यांच्या लेखनाबाबत स्त्रियांनीच केवळ चर्चा करावी, हे सर्वथा चुकीचे आहे. स्त्रीजीवन आणि स्त्रीजाणिवा समाजाच्या भिन्न भिन्न विचारविश्वांच्या केंद्रस्थानी आल्याशिवाय स्त्रीविषयक पुरुषप्रभान व्यवस्थेच्या धारणांमध्ये सकारात्मक परिवर्तन होणे शक्य नाही.
आज सहज उपलब्ध अशा माध्यमांतून होणारी यासंबंधीची चर्चा ही बरीचशी घाऊक आणि प्रतिक्रियात्मक स्वरूपाची आहे. स्वतंत्रपणे, सम्यकतेने आणि सखोलतेने स्त्रीविषयक आणि एकूणच सामाजिक संवेदनशिलता व विवेकसंपन्नता यांबाबत व्यापक स्तरावरून चर्चा घडून यायला हवी. या भूमिकेतून आयोजित केलेल्या चर्चासत्रात सादर झालेल्या निबंधांचे संपादन म्हणजे सदर पुस्तक होय. स्त्रीलिखित साहित्यामागील प्रेरणांचा आणि त्याच्या मुळाशी असलेल्या स्त्रीजाणिवांचा शोध घेण्याचा, स्त्रियांच्या आजवरच्या लेखनाची चिकित्सा करण्याचा आणि बदलत्या समाजजीवनात स्त्रीजाणिवांपुढे उभ्या ठाकलेल्या, ठाकणाऱ्या आव्हानांचे आकलन करून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे. स्त्रीसाहित्यविषयक विचारमंथनाला, त्यातील अलक्षित पैलूंच्या चर्चेला सदर पुस्तकाद्वारे चालना मिळेल अशी आशा आहे.