Description
तपशील लेखकाला माहीत नाहीये. तरीही काय झालंय ते त्यानं ऐकलेलं आहे. आणि ऐकलंय ते वेधक आहे.
तीन कुटुंबं होती म्हणजे अजूनही आहेतच ती. तीन कुटुंबं म्हणजे तीन जोडपी. त्यांची एकमेकांशी अत्यंत सुसंस्कृत मैत्री होती. त्यांनी मोठ्या समंजसपणे एकमेकांसोबत आपापले जोडीदार त्यात जोडीदारणीही आल्या. शेअर केले. अगदी मोकळी देवघेव. देवघेवीचे खुषीचे शरीरसंबंध. हे सगळं किमान पाच-सात वर्षे तरी सुरळीत चाललं. नंतर या सहाजणांतलं कोणीतरी एक वारल्याचं निमित्त झालं. कोणीतरी स्त्री किंवा पुरुष. त्यामुळे ते थांबलं.
बस्स. लेखकानं ऐकलंय ते इतकंच. सांगणाऱ्यालाही ते दुरून माहितीचं. कदाचित अंदाजानंच त्यानं ते कल्पिलेलं असेल, इतकं अंधुक. लेखकाला फक्त एक घटना माहीत आहे. तिच्याविषयीही त्याला पुरती खात्री नाहीच आहे. पण मानलं समजा, की बुवा आहे. काय होत असेल? माणसांचं काय होत असेल? कसं होत असेल हे सारं?
लेखक प्रयत्न करतो. एका बिंदूपासून सुरूवात करून घटना- प्रसंगांच्या मालिकाचे उभे आडवे धागे विणतो. वास्तव रचण्याचा प्रयत्न करतो. आणि एका धुकट बिंदुपासून दुसऱ्या तशाच बिंदूपर्यंत पोहोचल्याची कबुली देत थांबतो.