Description
मराठी वाङ्मयाचा प्रकारही अर्थात असाच आहें. त्यांतल्या त्यांत मराठी गद्यवाङ्मयाचा खरा प्रारंभ इंग्रजीशाहीनंतरचाच आहें. तत्पूर्वी कांही बखरी, पत्रे वगैरे एवढेच काय तें गद्य होतें व तेंहि वाङ्मयनिर्माणदृष्ट्या जन्माला आलेलें नव्हतें. इंग्रजी अमलानंतर इंग्रजी वाङ्मयाचा जो परिचय मराठीला झाला त्यामुळेंच मराठीत गोष्टी, कथानकें व पुढें कादंबऱ्या लिहिण्याचा परिपाठ पडूं लागला व तो आतां जोरांत येऊन बरी, वाईट, मध्यम अशी शेंकडों पुस्तकें हल्ली बाहेर पडूं लागली आहेत. तेव्हां आरंभापासून आतापर्यंतच्या पन्नास साठ वर्षांत जें हें कथात्मक वाङ्मय प्रसिद्ध झालें आहें त्यापैकीं बरेंचसें आतां सांप्रतच्या पिढीच्या दृष्टिपथाच्या पलीकडे गेले आहे. अथवा जाऊं लागलें आहें व म्हणूनच त्याचा आढावा कोठे तरी एक ठिकाणी काढलेला असणें अवश्य आहे.
विशेषतः मराठीचा प्रवेश आतां विश्वविद्यालयांत बहुशः पूर्णतेनें झाला असल्यानें तिच्यांतील स्वतंत्र अंगांचा अभ्यास करण्याची आवश्यकता उत्पन्न झाली आहे. अशा वेळी ही ‘कादंबरीची गोष्ट’ प्रसिद्ध करून रा. दंडवते यांनी मराठी भाषेंत एका उपयुक्त ग्रंथाची भर टाकली आहे. कालानुक्रमाने गोष्टी, कथानके, कादंबऱ्या कशा कशा लिहिल्या गेल्या त्या दर्शवून व एका स्वतंत्र प्रकरणांत मराठीतील प्रमुख कादंबऱ्यांच्या संविधानकांचा सारांश देऊन, त्यांनी कथावाङ्मयाचा एक चित्रफलकच वाचकांपुढे उभा केला आहे, असें म्हणण्यास हरकत नाही.
– दाजी नागेश आपटे