Description
ज्या लेखिकेच्या विचारात सावित्रीबाई फुलेंच्या वैचारिकतेचं बीज पडलेलं असेल अन् तिच्यातल्या सक्षम स्त्रीत्वात ‘अरुणा शानबाग’ चं अवकाशव्यापी दुःख अन् वेदना धगधगत असेल त्या स्त्रीच्या लेखनात स्मरणरंजनाचा भ्रमित खेळ कसा असेल? शिवाय ती स्वतःही तापलेल्या भुईवरून चालत आलीय. अनुभवांच्या ज्वालांमध्ये ती तावून-सुलाखून निघाली आहे. म्हणूनच तिनं साहित्याच्या पाटीवर आपलं नाव कोरलंय ‘ डॉ. प्रतिभा जाधव.’ वर्तमानाच्या जळजळीत वास्तवाला थपडा देत सक्षमपणे मातीत पाय रोवून उभ्या असणाऱ्या मानवीय संवेदनांना डॉ. प्रतिभा जाधव सहजी मुखर करत जातात. ‘काळोखाला दूर सारून…’ या ललित लेखसंग्रहातील त्यांच्या लेखनाचा सूर अधिक सच्चा अन् पारदर्शी आहे. दुःखाचं यत्किंचितही भांडवल नाही. समोर आलं त्याचा सहजी स्वीकार ही वृत्ती त्यांच्या लिखाणात ठायी ठायी जाणवते. थोडक्यात ‘काळोखाला दूर सारून…’ उजेडाची ज्योत प्रज्वलित करणारी धगधगत्या शब्दांची मशाल डॉ. प्रतिभा जाधव यांनी आपल्या लेखनातून पेटविली आहे. म्हणूनच वाचकालाही ही ‘मशाल’ समंजसपणाचा, आशावादाचा लखलखीत प्रकाशवाट दाखविल यात कुठलीही शंका नाही.