या पुस्तकाविषयी
जयंत पवार यांची कथा ही मूल्यवान आणि बहुपेडी आहे. जागतिकीकरण काळाचे चौफेर फोफावणे आणि गिरणगाव संस्कृतीच्या हद्दपारीच्या वाटेवरील त्यांनी रेखाटलेली कथाचित्रे अपूर्व आहेत. महानगरीय संवेदनदृष्टी, कामगार श्रमिकांच्या जगण्याचे अंतर्भेदी दर्शन, मानवी सहानुभाव आणि करुणाभावाची अनोखी कल्पसृष्टी, वंचितांचे कथन, मरणभानाची चित्रे व वास्तव-कल्पिताच्या बहुस्तरीय सर्जनशील संगमेळामुळे जयंत पवारांची कथा महत्त्वाची ठरली. त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण असा कथारूपबंध घडविला. एकारलेल्या पुराणकथांना त्यांनी कथेत बहुआबाजीपण आणि वर्तमानाचे संदर्भ प्राप्त करुन दिले. त्यांच्या कथेतील पारंपरिक आणि अपारंपरिक कथनशैलीच्या मिसळणीचे कोलाज सुनियोजित आणि चिरंबदी आहे. त्यांचे कथाशिल्प समाजजाणीव प्रगल्भ करणारे आहे. एका अर्थाने कथा या प्रकाराच्या शक्यतांचा विस्तार जयंत पवार यांच्या कथेत आहे. त्यामुळे त्यांची कथा भारतीय कथनपरंपरेचा आधुनिकावतार ठरतो.
संदीप दळवी यांच्या संपादित ग्रंथात जयंत पवार यांची कथासृष्टी जाणून घेण्याच्या आकलन वाटा आहेत. लेख, परीक्षणे, मुलाखत, कथाकलन असे त्याचे स्वरूप आहे. त्यामुळे जयंत पवार यांच्या कथासृष्टीचे मर्म उलगडून दाखविले आहे. त्यात कथाकलन, विश्लेषण आणि अर्थनिर्णयने आहेत. प्रस्तावनेत पवार यांच्या कथेचे उलगडविलेले कथास्वरूप मर्मज्ञ स्वरूपाचे आहे, त्यामुळे जयंत पवार यांच्या कथेची थोरवी आणि वेगळेपण उलगडून दाखवणारा हा कथासमीक्षाग्रंथ आहे. परस्परभिन्न प्रकृतीच्या व्यासंगी समीक्षकांचा हा कथाधांडोळा महत्त्वपूर्ण ठरतो. जयंत पवार यांच्या कथासृष्टीचा पसारा व सामर्थ्य जाणून घेण्यासाठी हा महत्त्वाचा संदर्भबिंदू आहे.
पुस्तकाची छायाचित्रे
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.