Description
सुचिता खल्लाळ या आजच्या महत्त्वाच्या कवयित्री आहेत. त्यांनी लिहिलेली ही कादंबरी बहुकेंद्री आहे. तरीही तिची मांडणी स्थूलमानाने दोन केंद्रात करणे शक्य आहे. तिचे एक केंद्र अधम स्तरावर जगणाऱ्या गावखेड्यात आहे तर दुसरे सधन आणि उच्च मध्यम स्तरावर जगणाऱ्या निमशहरी स्थानात आहे. ही दोन्ही जगे या ना त्या प्रकारे एकमेकांशी संबंधित आहेत. पण त्यांच्यातले नाते क्षीण झालेले किंवा होत चाललेले असे आहे. या दोन्ही स्तरावरील दुनिया; त्यांचे जगणे, त्यांचे प्रश्न, आशा-आकांक्षा, विचार, भाषा या सगळ्या पातळ्यांवर लेखिकेने ते फार सक्षम सहजतेने हाताळले आहे.
गावखेड्यातील जगण्याचे प्रश्न, तिथला जातिधर्मापल्याड जाणारा एकोपा, मतपेटीच्या राजकारणाने तिथे झालेली सामान्य माणसांच्या जगण्याची परवड हे एकीकडे आणि तिथेच मुळे असलेल्या पण उच्च शिक्षणाच्या आधारे शहरात स्थिर झालेल्या माणसांच्या जगण्यातील प्राथमिक संघर्षाच्या पार असलेल्या समस्यांची मांडणी लेखिकेने फार प्रगल्भतेने केलेली आहे. या सगळ्यात वाचक म्हणून माझ्या मनात उरते ती गोदू नावाची गावखेड्यातील एक आई. हीच ‘डिळी’ आहे. डिळी म्हणजे खांब किंवा मेढ. आपली मुले, आपला प्रपंच टिकविण्यासाठी ती अखेर आपली गर्भपिशवी काढून टाकत उसतोडणीच्या कामाला जायच्या निर्णयाला येते. हे वास्तव मनाला ढवळून टाकणारे आहे. जगण्याच्या संघर्षात अगदी कड्यावर उभी असतानाही हार न मानण्यातील तिची जिजीविषा असामान्य आणि अत्यंत करुण अशी आहे. वाचक म्हणून आपल्याला खडबडून जागे करणारी अशी कादंबरी सुचिता खल्लाळ यांनी लिहिली आहे.