Description
आपल्याकडे वेदोपनिषदांपासून संतकाव्यापर्यंत तृष्णा, तिची दुःखमूलकता आणि तिचा निरास या संबंधी सतत बोलले गेलेले आहे. पण हे प्राधान्याने माणसाच्या जगण्याविषयी आहे. तृष्णा ही मानवी जीवन, भाषा आणि साहित्य या सगळ्यांच्या मुळाशी आणि त्यांना व्यापून आहे याचे भान आपल्याकडील समीक्षकांनी फारसे प्रकट केलेले नाही. या पुस्तकात जगाच्या उत्पत्तीची आणि भाषेच्या उत्पत्तीची आपली मिथके तृष्णेवर किती जोर देतात; आत्मविष्कारामागे, काव्याविष्कारामागे आणि भाषाबंधामागेही तृष्णा कशी काम करते हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या दृष्टीने ज्ञानेश्वरीचा बंध पहिल्या अध्यायापासून अखेरच्या अध्यायापर्यंत तृष्णेने किती प्रभावित झालेला आहे याचे सविस्तर विवरण केले आहे. तसे करताना या बंधाच्या काव्यात्मतेचा तृष्णेच्या आविष्कारांशी मेळ घातलेला आहे. त्यासाठी आधार म्हणून एका प्रकरणात तृष्णेच्या काव्यशास्त्राची मांडणी केली आहे. अशा प्रकारे हे पुस्तक समीक्षेची एक नवी पाऊलठसे नसलेली वाट चोखाळण्याचा प्रयत्न करते.