Description
डॉ नंदकुमार उकडगावकर M.B.B.S., M.D.,D.M. (Neurology) जन्म: १६ जून, १९४९ डॉ नंदकुमार गोविंदराव उकडगावकर हे मराठवाडा विभागातले पहिले मेंदूविकारतज्ञ आहेत. १९६५च्या शालान्त परीक्षेत बोर्डात सर्वप्रथम आलेल्या सरस्वती भुवन, औरंगाबादच्या डॉ. उकडगावकरांचे शालेय शिक्षण हैदराबाद व अहमदनगर येथेही झाले. त्यांनी एम. बी. बी. एस. (१९७१), एम. डी. (१९७५) या पदव्या सरकारी वैद्यकिय महाविद्यालय, औरंगाबाद व डी. एम. (मेंदूविकार) ग्रँट मेडीकल कॉलेज, मुंबई येथून प्राप्त केल्या. सर्व शैक्षणिक कारकर्दीत त्यांनी प्रथमश्रेणी कायम ठेवली. त्यांनी इंग्लंड येथील न्यू कॅसल अपॉन टाईन व न्यूर्यार्कच्या सेंट ल्यूकस हॉस्पिटल येथे मेंदूविकारउपचारांचे विशेष प्रशिक्षण घेतले आहे. ते सरकारी वैद्यकिय महाविद्यालय, औरंगाबाद व ग्रँट मेडीकल कॉलेज, मुंबई येथे प्राध्यापक म्हणून १७ वर्षं कार्यरत होते. एम. बी.बी.एस. व एम.डी.चे परीक्षक व गाईड म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांचे वैद्यकिय क्षेत्रातले विद्यार्थी डॉक्टर म्हणून सर्व मराठवाडाभर विखुरले आहेत. १९९३ मधे औरंगाबादमधे मराठवाड्यातील रुग्णांच्या मेंदूविकार उपचारासाठी प्रथम रुग्णालय त्यांनी सुरु केले. दर वर्षी मेंदूविकार परिषदां उपस्थित रहाण्यासाठी ते विविध देशांना भेटीही देत असतात.औरंगाबादचे ते संस्थापक १९८७ साली स्थापन केलेल्या फिजिशियन्स असोसिएशन, असून सरस्वती भुवन माजी विद्यार्थी संघटनेचे माजी सरचिटणीस आहेत. डॉ. नंदकुमार उकडगावकर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची क्रिकेट पंचपरीक्षा उत्तीर्ण असून महाविद्यालयीन काळात ते आंतर विश्वविद्यालयीन क्रिकेट स्पर्धांमधे सहभागी होत असत. बहुरंगी व्यक्तिमत्व लाभलेल्या डॉ. उकडगावकर यांनी मराठवाडा विद्यापीठाची रशियन भाषेची तीन वर्षांची पदवी परीक्षाही उत्तीर्ण केलेली आहे. शालेय वर्गमित्रांच्या वार्षिक आनंदोत्सवाचे गेल्या ३० वर्षांपासून यशस्वी संयोजन करत असून औरंगाबाद येथील १०६ वर्षे कार्यरत असलेल्या ३०,००० विद्यार्थी संख्या असणाऱ्या श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे ते सध्या सरचिटणीस आहेत.यांचा आपल्या शालेय मित्रांवर आधारीत ‘हेलमेटस’ हा विनोदी लेखांचा संग्रह ‘मेहता पब्लीशिंग हाऊस’ने प्रकाशित केलेला आहे. तसाच ‘द्रौपदी वस्त्रहरण’ हा फार्सिकल ढंगानं लिहिलेला दीर्घांकही प्रसिद्ध झालेला आहे व ‘उकडलेले मोदक’ हा दुसरा विनोदी ललितलेखांचा संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे.