Description

स्त्रीवाद म्हणजे स्त्रीच्या दृष्टिकोनातून जीवनाच्या सर्व पैलूंवर टाकलेला दृष्टिक्षेप. स्त्रीवाद ही एक जाणीव आहे. ते एक जीवनविषयक तत्त्वज्ञान आहे. तो एक सैद्धांतिक दृष्टिकोन आहे. त्याचप्रमाणे ती संघटित कृतीसाठी साददेखील आहे. त्यामुळे स्त्री-पुरुषांनी स्वतंत्र व्यक्ती म्हणून सन्मानाने जगण्यासाठी सर्व सामाजिक संस्थांचा केलेला पुनर्विचार आणि पुनर्रचना, म्हणजे स्त्रीवाद. वैयक्तिक आयुष्यात स्त्रीवाद आपल्या पातळीवर जगण्यात उतरवता येतो. आपण कोणत्याही क्षेत्रात काम करीत असू, तरी तिथेही तो स्वत:चे अस्तित्व देणारे तत्त्वज्ञान म्हणून त्याचे अस्तित्व दिसते. म्हणजेच स्त्रीवाद हे एक पोथीबद्ध, कर्मठ, एकसाची तत्त्वज्ञान नाही आणि नसावे, असे म्हणता येईल. स्त्रीवाद या तात्त्विक प्रवाहाच्या अंतर्गत अनेक उपप्रवाह असले, तरी या भेदांपलिकडे जाणारी काही समान सूत्रे स्त्रीवादी म्हणवणाऱ्या सर्वांसाठी अर्थपूर्ण ठरतात. यात त्या त्या कालखंडात विशिष्ट सामाजिक परिवेशात स्त्रीत्व आणि पुरुषत्वाची व्याख्या कशी ठरते, त्याची कोणती वैशिष्ट्ये तो तो समाज ठरवतो हे तपासणे, स्त्री-पुरुषांच्या वर्तनप्रकारातील भिन्नतेमागची समाजनिर्मित कारणे कोणती – हे खोलात जाऊन तपासणे, पुरुषप्रधान व्यवस्थेची आर्थिक, ऐतिहासिक व राजकीय कारणमीमांसा करून स्त्रियांचे दुय्यमत्व कमी व्हावे, स्त्रीदास्याचा अंत व्हावा, म्हणून सातत्याने प्रयत्न करणे.

Additional information

Book Editor

Sumati Lande | सुमती लांडे