Description
मराठी अक्षरवाङ्मयाच्या समृद्ध कालपटावरील काही प्रतिभावंत या संग्रहातून वाचकांना भेटतात, चिरस्मरणीय गोविंदाग्रज, विचारवंत गोविंद चिमणाजी भाटे ते प्रिया तेंडुलकर, प्रवीण दशरथ बांदेकर पर्यंत. फारसी-मराठी सेतुबंध निर्माण करण्याचे अनमोल कार्य करून गेलेले माधव जूलियन आणि विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, शंकर वैद्य अशा नामवंत कवींचे गुणविशेष या संग्रहातील लेखांतून उलगडले गेले आहेत.
अरविंद गोखले, शांताराम या प्रथितयश कथाकारांच्या कथालेखनाचा लेखाजोखा मांडताना मराठी कथेच्या काही अलक्षित स्थळांचा नेमका निर्देश झाला आहे तर गंगाधर गाडगीळ या ज्येष्ठ कथाकाराचे प्रवासवर्णनकारही असणे अधोरेखित झाले आहे. विलास खोले यांनी संशोधकाच्या भूमिकेतून सिद्ध केलेली महर्षी कर्वे आणि रमाबाई रानडे यांची साक्षेपी चरित्रे महाराष्ट्राची नैष्ठिक आणि वैचारिक उंची कशी दाखवून जातात याचे नीटस विवेचन लक्षवेधी ठरले आहे. साहित्यिक पत्रव्यवहार उलगडून पाहताना विनोबा आणि सानेगुरुजी यांच्यासारख्या थोर विभूतींचे होणारे चिंतनदर्शन मनाला समृद्ध करणारे आहे.