Description
मराठीचा मूलभूत व्याकरणविचार आजच्या अभ्यासक्षेत्रात तरी ठप्प झाल्यासारखा वाटतो. अशावेळी डॉ. सुहासिनी पटेल यांचा आपल्या सेवानिवृत्तीच्या काळात केवळ ‘स्वान्तः सुखाय’ केलेला ” मराठी धातू : स्वरूप आणि चिकित्सा’” हा अभिनव पण शोधक व चिकित्सक अभ्यास आपल्यासमोर ग्रंथरुपात आलेला आहे. याबद्दल प्रारंभीच मी त्यांचे कौतुक व अभिनंदन करतो. मराठी व्याकरणविचार ही डॉ. लीला गोविलकरांनी म्हटल्याप्रमाणे “अवघड व अनोळखी’ वाटचाल आहे. कारण मराठी भाषेच्या व्याकरणात उद्भवणाऱ्या समस्यांची संख्या ‘भरपूर’ आहे. त्यातही पुन्हा ‘मराठीचा धातूविचार’ हा विषय तर अगदी दादोबा पांडुरंगांपासून ते आजपर्यंत सतत विवाद्यच राहिलेला आहे.
दादोबा, कृष्णशास्त्री दामले, वि. का. राजवाडे, कृ. पां. कुलकर्णी, मंगळूरकर, अर्जुन वाडकर, डॉ. लीला गोविलकर इत्यादी अनेक व्यासंगी व्याकरण अभ्यासकांची परंपरा महाराष्ट्राला अभिमानास्पद अशीच आहे. याच परंपरेत उद्याचा महाराष्ट्र डॉ. सुहासिनी पटेलांचे नाव पण ओवणार अशा तोलामोलाचा हा ग्रंथ आहे. धातूचा अभ्यास भाषाविज्ञानाच्या दृष्टीने ‘रूपिमविचारात, तेही पुन्हा आशयबोधक रुपिमविचारात मोडणारा आहे. एकेकाळी वादग्रस्त असणारी संयुक्ते क्रियापदे आज त्यांच्या अनेकार्थतेमुळे मराठीच्या वैभवाची निदर्शक झालेली आहेत. त्यामुळे मराठी भाषेत धातूंमार्फत संवेदनाची प्रक्रिया कशी व किती प्रकारांनी होते याचा सशास्त्र व सुविहित अभ्यास मांडणे हे कठीण कार्य आहे. परंतु डॉ. पटेल यांनी या ग्रंथात हे यशस्वीरित्या साध्य केलेले आहे. या ग्रंथाने ‘मराठी व्याकरण’ विषयक चर्चेचा ‘पुनश्च हरिओम्’ होईल असे मला निश्चितपणे वाटते. हे बळ या ग्रंथात अवश्य आहे.– डॉ. द. दि. पुंडे