Description
भालचंद्र नेमाडे यांची ‘कोसला’ ही मराठी कादंबरीच्या इतिहासातील अपूर्व घटना. कोसलाची अपूर्वता अनेक अभ्यासकांनी उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे.
प्रस्तुत ग्रंथात कोसलातील नवतेचा आविष्कार, आशय, जीवनदृष्टी आणि अभिव्यक्ती स्वरूप या तिन्ही अंगांनी कसा झालेला आहे हे शोधण्याचा सखोल, गंभीर प्रयत्न केलेला आहे. परात्मतेच्या संदर्भात ‘कोसला’तील निसर्ग माणूस संबंधाबदलचा विचार आणि त्यामागील जीवनदृष्टी यांचा विचार प्रस्तुत ग्रंथात सविस्तर विवेचिता आहे हे या ग्रंथाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
‘कोसला’तील नैतिकदृष्टी प्रगल्भ आणि मानवी अस्तित्वाच्या संदर्भात महत्त्वाची आहे. हे डॉ. सावंतांनी साधार स्पष्ट करून ‘कोसला’च्या भाषेचे लीळाचरित्राच्या महानुभाव गद्यशैलीशी आणि मराठी बोलीभाषेशी कसे घनिष्ठ नाते आहे, हे अनेकविध वैशिष्ट्यांच्या आधारे दाखवून दिलेले आहे.
अर्वाचीन काळातील एकाच साहित्यकृतीची निवड पीएच.डी. पदवीच्या अभ्यासासाठी केल्याची उदाहरणे मराठीत अपवादात्मक. विशेषतः कादंबरीच्या बाबतीत अशा प्रकारच्या अभ्यासाचा मराठीतला पहिलाच प्रयत्न ‘कोसला’ कादंबरीवरील या प्रबंधाद्वारे झालेला आहे. डॉ. सावंत आपले निष्कर्ष निःसंदिग्ध स्वरूपात, आत्मविश्वासाने मांडतात. यात प्रतीत होणारी विवेचनाची, विश्लेषणाची व प्रतिपादनाची निर्मळ पारदर्शक व ठाम दृष्टी अभ्यासकांच्या साधार आत्मविश्वासाची साक्ष पटबिते.
‘उदाहरणार्थ कोसला’ पठडीतील अभ्यासकांना आपल्या अभ्यासपध्दतीबाबत गंभीर पुनर्विचार लावणारा व नव्या अभ्यासकांना समर्थ, मार्गदर्शक असा दणकट वस्तूपाठ निश्चित ठरेल.