Description

अलिकडे मराठीच्या व्याकरणासंदर्भात, त्यामधील विविध वादग्रस्त मुद्यांबाबत बऱ्यापैकी विचारमंथन होत आहे. मराठीच्या अभ्यासकांसमोर तसेच विद्यापीठ, महाविद्यालय, विद्यालय अशा वेगवेगळ्या स्तरांवर मराठीचे अध्ययन आणि अध्यापन करणाऱ्या विद्यार्थी व अध्यापकांसमोर हे विचारमंथन यावे व त्यांच्या व्याकरणविषयक विचारांना खाद्य मिळावे हा हेतू या पुस्तक – निर्मितीमागे आहे. त्याचप्रमाणे स्पर्धापरीक्षांच्या निमित्ताने मराठीच्या व्याकरणाचा अभ्यास करणाऱ्या स्पर्धकानाही मराठीच्या व्याकरणाचे सध्याचे स्वरूप आकलन व्हावे अशा पद्धतीने या पुस्तकाची मांडणी केलेली आहे.व्याकरण हा विषय शिक्षणाचा एक भाग म्हणून जसा महत्त्वाचा आहे, तसाच तो एक महत्त्वाचा भाषाविषय आहे. समाजाच्या जीवन व्यवहाराशी व एकंदरच माणसाच्या जडणघडणीशी त्याचा आंतरिक संबंध आहे. जसा समाज तशी त्याच्या भाषेची जडणघडण व रचना असते. भाषा, भाषेतील शब्द, प्रत्ययाची जोड घेऊन सिद्ध होणारी पदे व वाक्ये ही सगळी भाषारूपे समाजाच्या वेळोवेळी बदलत्या प्रवृत्तीचे व स्वरूपाचे प्रतिबिंब पकडून ठेवीत असतात. मराठीच्या व्याकरणाच्या अभ्यासकाला आणि जिज्ञासू वाचकाला हे पुस्तक निश्चितच मौलिक वाटेल आणि मार्गदर्शकही ठरेल!